Site icon Jan Bharat Samachar

१५० पोलीस, सर्व रस्ते बंद अन्. पुण्यात रात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान काय घडलं?

Spread the love

पुणे; दि.११ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील बुधवार पेठ या वेश्यावस्तीत बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई केली.

त्यामुळे संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. रात्री १२ वाजता सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु होती.

गुन्हे शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक गल्लीबोळांत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी ५० हून अधिक कुंटणखान्यांची झडती घेत पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली.

निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस आक्रमक
काही दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका बांगलादेशी तरुणीला वाचवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आणि वरिष्ठांपासून माहिती लपवल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात त्या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेतील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी हे कॉम्बिंग ऑपरेशन आखले.

गल्लीगल्लीत नाकाबंदी आणि सर्च मोहीम
रात्री १२ च्या सुमारास गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेला चारही बाजूंनी वेढा घातला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकी आणि संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत ५० पेक्षा अधिक संशयित घरे आणि कुंटणखान्यांच्या खोल्यांची तपासणी केली. यात प्रामुख्याने मानवी तस्करी (Human Trafficking) आणि अमली पदार्थांच्या साठ्याबाबत शोध घेण्यात आला. तसेच परिसरात विनाकारण वावरणाऱ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणांची अंगझडती घेण्यात आली.

ऑपरेशनचा मुख्य हेतू काय होता?
या धडक मोहिमेमागे पोलिसांचे तीन मुख्य उद्दिष्ट होते. ज्या अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने किंवा फसवणूक करून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणे, वस्तीमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची (प्रामुख्याने बांगलादेशी) ओळख पटवणे, असे तीन मुख्य उद्देश होते.

शुक्रवार पेठ चौकीजवळ सखोल चौकशी
याप्रकरणी शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या आसपास असलेल्या संवेदनशील भागात महिला पोलिसांनी कुंटणखान्यातील महिलांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती गोळा केली. या मोहिमेत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सुमारे १५० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Exit mobile version