Jan Bharat Samachar

महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज : डॉ. पराग काळकर

Spread the love
जागतिक महिला दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनतर्फे
पारंपरिक वेशभूषेत दुचाकी रॅली, महिलांचा सन्मान
पुणे: “आजच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध केली आहे. महिलांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यास त्या समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महिलांचे सक्षमीकरण हे केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनच्या वतीने दुचाकी रॅलीचे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. सिंहगड रस्त्यावरील मॉंटेरोसा सोसायटी क्लब हाऊसमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी प्रेरक वक्ते डॉ. दत्ता कोहिनकर, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, आयआरएस डॉ. संदीप साठे, उद्योजक तुषार गोसावी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, डॉ. राजेंद्र खेडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संयोजक व पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे, संचालिका पुष्पा कांबळे यांच्यासह मॉंटेरोसा सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांच्या सन्मानार्थ आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध वेशभूषा करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, आरोग्य, कला आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनुजा देशमाने यांच्यासह माधुरी बर्वे व सुनीता डांगे (शिक्षण), वृषाली गोसावी (उद्योग व पर्यावरण), ऐश्वर्या थोरात (राजकारण), मनीषा खेडेकर (सामाजिक), ऍड. ऋतुजा चोरगे-साठे (वकिली), आर्या भागवत व आर्या पापळ (क्रीडा) यांना ‘पद्मा सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटेरिअर डिझाइनर अमृता जाधव यांचा, तसेच ७५ वर्षांवरील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अनुजा देशमाने यांनीही महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कार्याची दखल घेतली जाते आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कायदे आणि योजना पुरेशा नसून समाजातील मानसिकतेत बदल होणेही तितकेच आवश्यक आहे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःच्या हक्कांबरोबरच जबाबदाऱ्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे, असे असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. दत्ता कोहिनकर यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. माधुरी बर्वे, ऍड. ऋतुजा चोरगे-साठे, ऐश्वर्या थोरात, मनीषा खेडेकर यांनीही मनोगते व्यक्त केली. फाउंडेशनचे सल्लागार जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले.  शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा कांबळे यांनी आभार मानले.
Exit mobile version