Site icon Jan Bharat Samachar

आळंदीतील वाहतूक कोंडीचा बळी – माजी सीआरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वार्ताहर : आळंदी तीर्थक्षेत्र देवदर्शनासह आता लग्नाचे शहर म्हणून ओळखू लागले आहे. आळंदी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी मुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदय द्रावक घटना समोर आली आहे. यात भिमाजी तुकाराम चौरें ( वय ५९ वर्षे ), जे केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मधून २२ वर्षे देशसेवा करून निवृत्त झाले होते, यांचे गंभीर हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. मात्र त्यांना वेळेत उपचार न मिळाल्या मुळे त्यांचा जीव गेला असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

चौरें कुटुंबीय आळंदीतील पद्मावती रोड, जगन्नाथ पार्क येथे रहात आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, भिमाजी चौरें यांना घरीच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. घरा जवळच के.के. हॉस्पिटल अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असतानाही, पद्मावती रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत पोहोचवणे अशक्य झाले.

त्या दिवशी परिसरातील अनेक मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. चार चाकी वाहनातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने कुटुंबीयांनी वाहन रस्त्याच्या कडेला सोडून देत, भिमाजी चौरें यांना ऑटो रिक्षामध्ये हलवावे लागले. परिस्थिती इतकी बिकट होती की, रिक्षाला वाट मिळावी म्हणून त्यांच्या पत्नी आणि मुलीला रस्त्यावर धावत जाऊन वाहने बाजूला करण्याची विनवणी करावी लागली.

अवघ्या १ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल २० मिनिटे लागली. या विलंबामुळे भिमाजी चौरें यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे आळंदीतील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पद्मावती रोडवरील वाढत्या मंगल कार्यालयांमुळे होणारी वाहतूक कोंडी ही स्थानिकां साठी रोजची डोकेदुखी बनली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा वैयक्तिक वाहनांना मार्ग मिळणे कठीण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः, पद्मावती रोड वरील वाहतूक नियंत्रण, पार्किंगची योग्य व्यवस्था, आणि मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनावर निर्बंध घालण्याची गरज सामाजिक कार्यकर्ते शशिकांतभाऊ घुंडरे पाटील यांनी व्यक्त केली. या पूर्वी ही या भागात अपघात होऊन वाहतुकीचे नियोजन अभावी बळी गेले आहेत. l

देशसेवा केलेल्या एका निवृत्त जवानाचा जीव वाहतूक कोंडी मुळे जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, यापुढे अशी घटना घडू नये या साठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकां कडून होत आहे. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर आळंदी येथील स्मशानभूमीत रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version