पुणे, : मावळ लोकसभा मतदारसंघातील वीज प्रश्नांचा खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी सोमवारी आढावा घेतला. महावितरणच्या गणेशखिंड येथील ‘प्रकाश भवन’ मधील सभागृहात सोमवारी (दि.४) सकाळी ही आढावा बैठक झाली.
पिंपरी, तळेगाव, वडगाव, आकुर्डी, देहूरोड, देहूगाव, किवळे, रावेत आणि लोणावळा परिसरातील तक्रारींची दखल घेऊन, वीज पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे तसेच वीज पुरवठा अखंडित व सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत देखभाल-दुरुस्ती कामे करण्याच्या सूचनाही खा. बारणे यांनी दिल्या. वाढत्या वीज मागणीचा विचार करून अतिभारीत रोहित्रांची क्षमता वाढवणे किंवा नवीन रोहित्र बसवून वीज वितरण जाळे सक्षम करावे. तसेच सर्व चालू प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश खा. बारणे यांनी दिले.
विविध प्रकल्पांतर्गत वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी व बिघाड दुरुस्तीचा कालावधी कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने स्वतंत्र ‘भूमिगत मार्गिका’ (Duct) सोडण्याची तरतूद महापालिकेच्या डीपीआर मध्ये करण्यासाठी महापालिकेला सूचना द्याव्यात अशी विनंती महावितरणतर्फे करण्यात आली. त्यावर लवकरच पालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही खा. बारणे यांनी दिले.
बैठकीला महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव नेहेते यांचेसह इतर वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
शुक्रवारी जनजागृती मेळावा –
ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्मार्ट मीटरबाबत विशेष जनजागृती आणि तक्रार निवारण शिबिरे आयोजित करण्याचे तसेच प्रधानमंत्री-सूर्यघर योजना व सौर कृषीपंप योजनेची जनजागृती करण्याचे निर्देश खा. बारणे यांनी महावितरणला दिले. त्यावर मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे परिमंडलातील सर्व स्थानिक कार्यालयांत एकाच दिवशी हे मेळावे घेणार असल्याचे सांगितले.

