Site icon Jan Bharat Samachar

तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने उद्योगांचा विकास झपाट्याने होईल पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन

Spread the love

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तंत्रज्ञानाधारित उद्योगांची गरज

पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन

पुणे/पिंपरी, ता. ७: “देशाच्या विकास प्रक्रियेत महत्वाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना सुयोग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी, तसेच विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. एआय, डिजिटायझेशन यामुळे उद्योगांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळेच २०४७ पर्यंत भारताची विकसनशील देश ही ओळख पुसून विकसित देश अशी ओळख निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट्सच्या वतीने आयोजित भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद कांबळे बोलत होते. प्रसंगी  संयोजक ‘एक्स्पोनॉमिक्स’चे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप, आरती भोसले-अहिवळे, सनवन टेक्नॉलॉजीच्या संचालक श्रद्धा कुलकर्णी, अप्लिका कन्सल्टन्सीचे प्रमुख रॉड अल्बुकर्क, रिंगफिडर ट्रान्समिशनचे सीईओ दीपान रामलिंगम, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे इरफान आवटे, प्रसाद कुलकर्णी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सीईओ दिलीप बटवाल, डॉ. प्रकाश मुंडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे प्रदर्शनाचे कौतुक केले. यावेळी प्रदर्शनाविषयी माहिती असलेल्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या तीन दिवसांच्या प्रदर्शनात उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक्स, रिटेल, हेल्थकेअर, कन्स्ट्रक्शन आणि एडटेक या क्षेत्रांतील अत्याधुनिक ईआरपी आणि डिजिटल सोल्युशन्स सादर होणार आहेत. तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा व प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत (ता. ९) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
मिलिंद कांबळे म्हणाले, “विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जावे. त्यातून मोठी रोजगारनिर्मिती होईल. भारतात येणारी थेट परदेशी गुंतवणूक सर्वाधिक ४० टक्के महाराष्ट्रात; त्यातही पुण्यातील उद्योग क्षेत्रात अधिक येते. महाराष्ट्राचे धोरण उद्योग व गुंतवणुकीला पूरक आहे. पुण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. दावोसमध्ये होत असलेले सामंजस्य करार पूर्णत्वाकडे जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे. कोरोना संकटकाळात भारताने मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती केली आहे. उद्योगांनी ‘ईआरपी’ तंत्रज्ञान वापरावर अधिक भर दिला पाहिजे. ‘एआय’मुळे उद्योगांचे आयाम बदलत आहेत. त्यामुळे एआय, डेटा सायन्स, मशीन लर्निंग व अन्य आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे.”
प्रास्ताविकात सागर अहिवळे म्हणाले, “देशभरातील १०० हून अधिक ईआरपी कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप्स यामध्ये सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला पुढे नेण्यासाठी आवश्यक दिशा आणि मार्गदर्शन देणारे हे प्रदर्शन ‘डिजिटल भारत, विकसित भारत’ संकल्पनेला गती देईल. महाराष्ट्राला स्मार्ट औद्योगिक राज्य म्हणून अधिक बळकट करेल. हा उपक्रम उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि ‘एआय व ईआरपी: ट्रान्सफॉर्मिंग एंटरप्राईज एट स्केल’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
श्रद्धा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे हे बहुआयामी शहर आहे. सांस्कृतिक व विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने गेल्या काही वर्षांत डिजिटल क्रांती घडवली. आयटी हब, इंडस्ट्री हब अशी ओळख मिळवली. आसपासच्या परिसरात उद्योगांचे मोठे जाळे पसरले आहे. त्यांचा सर्वांगीण विकास, जागतिक दर्जा आणि सक्षम उत्पादक निर्माण होण्यासाठी डिजिटल क्रांती उपयुक्त ठरणार आहे.”
आरती भोसले-अहिवळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील तसेच देशातील उद्योगांना पारंपरिक कार्यपद्धतीतून बाहेर काढून स्मार्ट, डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम औद्योगिक इकोसिस्टममध्ये रूपांतरित होण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे ठरेल. तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उद्योगांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता वाढेल.”
“एमएसएमई आणि एसएमई क्षेत्रातील उद्योगांना ईआरपी आणि एआय यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल. उद्योगांमध्ये नव्या भागीदारी आणि विकासाच्या संधी निर्माण होतील,” असे मिलिंद हडप यांनी नमूद केले.
Exit mobile version