पुणे : जागतिक एनआरपी डे निमित्त अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनने नवजात बाळांच्या संरक्षणासाठी आणि प्रसूतीदरम्यान आपत्कालीन सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवजात पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत (NRP) विशेष कार्यशाळेचे आयोजन केले. नवजात पुनर्जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरम (NNF) इंडिया यांच्या नेतृत्वाखाली देशभर हा उपक्रम राबविण्यात येतो.
देशभर एकाच वेळी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नवजात बाळाला जन्मानंतर तातडीने तसेच प्रभावी उपचार मिळावेत. या उपक्रमांतर्गत सुमारे ९९८ प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे जवळपास २० हजार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. नवजात बाळांचे टाळता येण्याजोगे मृत्यू कमी करण्यासाठी वेळीच उपचार आणि अनुभवी तज्ज्ञांकडून वेलोवेळी सल्ला घेण्यावर भर देत डॉ. लल्लन कुमार भारती यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अंकुरा हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यशाळेत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नवजात बाळांना जन्मावेळी प्रभावीपणे श्वास घेण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैज्ञानिक आणि प्रत्यक्ष वापरातील पुनर्जीवन तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सिद्धार्थ मदभुशी आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अनुषा राव हे एनआरपीचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. बाळाच्या जन्मानंतरची पहिली काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्वरित मदत मिळाल्यास बाळाला एक निरोगी आयुष्य जगता येते.
या कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आणि माता व नवजात आरोग्यसेवेशी संबंधित टिमसाठी आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण सत्रांचा समावेश करण्यात आला होता. नवजात बाळाच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून अचुक कौशल्य, पुर्वतयारी आणि टीमवर्कचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमाविषयी बोलताना अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनचे वैद्यकिय संचालक डॉ. सिद्धार्थ मदभुशी म्हणाले, बाळाच्या जन्मानंतरची पहिली काही मिनिटे ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहेत. एखाद्या नवजात बाळाला श्वास घेण्यास अडचण येत असल्यास तातडीने उपचार आणि तज्ज्ञांच्या मदतीची गरज असते आणि येणारा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. निओनेटल रिससिटेशन प्रोग्रामद्वारे आरोग्यसेवा व्यावसायिकांना अशा आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय टिम एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येतात. प्रत्येक नवजात बाळाला आयुष्याची निरोगी सुरुवात करता यावी यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरतो. वेळीच उपचार आणि आधुनिक उपचार पध्दतींचा वापर केल्यास अनेक नवजात बालकांमधील मृत्यू टाळता येऊ शकतात.
हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले की, एनआरपी डे सारखे उपक्रम नवजात पुनर्जीवनाविषयी जनजागृती वाढविण्यास आणि शहरी तसेच ग्रामीण भागांतील नवजात आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.

