Site icon Jan Bharat Samachar

पुण्यात गुन्हेगारी फोफावली; पोलीस यंत्रणा अपयशी प्रदेशाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांचा तीव्र संताप

Spread the love

पुणे | प्रतिनिधी: राज्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या भीषण गुन्ह्यांच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिला अत्याचार, अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, खून, गोळीबार, रस्त्यावरची दहशत, ड्रग्ज रॅकेट आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पुणे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून त्यांनी पुणे पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करत “पुणे पोलीस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत आहेत का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.ॲड. चव्हाण यांनी म्हटले की, “पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवरील अमानुष गुन्हे, रस्त्यावर उघडपणे होणारे हल्ले आणि गुंडांचे वाढते धैर्य पाहता सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.याच काळात पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका महिला वकिलावर कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.तसेच नवले पुलाजवळ किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून खाली फेकण्यात आल्याची अमानवी घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना देखील समोर आली आहे. भरदिवसा अशा प्रकारे शस्त्रांचा वापर होत असल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.ॲड. शंकर चव्हाण म्हणाले की, “आज पुण्यात सामान्य नागरिक सुरक्षित नाही. मुली, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते; पण आज ते गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे.”ते पुढे म्हणाले की, “ड्रग्ज, टोळ्या, हल्ले आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही.” बारामती परिसरात देखील ड्रग्ज विक्री आणि गुन्हेगारी वाढल्याची तक्रार स्थानिक स्तरावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.ॲड. चव्हाण यांनी पोलीस प्रशासनावर टीका करत म्हटले की, “घटना घडल्यानंतर आरोपींना अटक करणे हीच कायदा सुव्यवस्थेची व्याख्या नाही. गुन्हे होण्याआधी त्यांना रोखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र सध्या पोलीस यंत्रणा केवळ प्रतिक्रियात्मक पद्धतीने काम करत असल्याचे दिसते.”ते पुढे म्हणाले की, “राजकीय दबाव, बदलीचे राजकारण आणि स्थानिक गुंडांना मिळणारे संरक्षण यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे.” त्यांनी राज्य सरकारने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा विशेष आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली.“महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा, रात्रीच्या गस्तीत वाढ, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.ॲड. चव्हाण यांनी शेवटी इशारा देत म्हटले की, “जर पुण्यातील वाढती गुन्हेगारी तात्काळ रोखली नाही, तर सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास उडेल. सरकार आणि पोलीस प्रशासनाने जनतेला सुरक्षित वातावरण देणे ही त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे.”एकंदरीत, गेल्या काही महिन्यांत पुण्यात घडलेल्या सलग गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ॲड. शंकर चव्हाण यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version