मुंबई | प्रतिनिधी : पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेल्या गॅंगवॉर, खून, बलात्कार, गोळीबार आणि भीषण अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत पुण्यात सलग घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गॅंगवॉर, महिला अत्याचार, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, भररस्त्यातील हल्ले आणि वाढते अपघात यामुळे पुणेकर भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ॲड. शंकर चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून तीव्र संताप व्यक्त करत सरकार आणि गृह विभागावर प्रश्न उपस्थित केले होते.
ॲड. चव्हाण म्हणाले की, “पुणे हे राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र मानले जाते. मात्र आज त्याच पुण्याची ओळख गुन्हेगारी, टोळी संघर्ष आणि भीतीचे शहर अशी होत चालली आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे.
ते पुढे म्हणाले की, “गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरलेला दिसत नाही. भरदिवसा गोळीबार होतो, महिलांवर अत्याचार होतात, टोळ्यांचे हल्ले होतात आणि निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने प्रत्यक्ष ॲक्शन मोडवर येण्याची वेळ आली आहे.” ॲड. शंकर चव्हाण यांनी सांगितले की, पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनामध्ये पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई, विशेष गॅंगवॉर विरोधी मोहीम, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके, रात्रीच्या गस्तीत वाढ, ड्रग्ज माफियांविरोधात विशेष कारवाई आणि भीषण अपघात रोखण्यासाठी कठोर वाहतूक नियंत्रण उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, “घटना घडल्यानंतर आरोपी पकडणे पुरेसे नाही. गुन्हे होण्याआधी ते रोखणे हीच खरी कायदा सुव्यवस्था आहे. पुणेकरांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी अधिक आक्रमक आणि परिणामकारक पावले उचलली पाहिजेत.”
एकंदरीत, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शंकर चव्हाण यांनी पोलीस महासंचालकांना निवेदन देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, या विषयावर राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

