Site icon Jan Bharat Samachar

गिर्यारोहण ह्या साहसी क्रीडा प्रकाराला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार – ना. मुरलीधर मोहोळ.

Spread the love
गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे.यातून एक साहसी पिढीची जडणघडण होत आहे.या खेळाला आर्थिक पाठबळ आवश्यक आहे तसेच या खेळासाठी स्वतंत्र विमा कवच असणे गरजेचे आहे असे मत ऑलम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष ना. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.याबाबत गिरीप्रेमीचे उमेश झिरपे माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत, मी या साठी शासन कडे  नक्की पाठपुरावा करेन आणि या खेळा ला अधिक चालना मिळेल असा प्रयत्न नक्की करेन असेही ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करून परतलेल्या अखिल काटकर चा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, अखिल च्या आई स्मिता काटकर, मामी लेखिका निलिमा बोरवणकर, मामा अजय बोरवणकर, विजय बोरवणकर इ मान्यवर उपस्थित होते.
आपल्याकडे क्रिकेट ला प्रचंड वलय आहे मात्र ( Glamour ) अन्य क्रीडाप्रकारांना हवी तेवढी लोकमान्यता आणि राजमान्यता मिळत नाही अशी खंत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष आणि रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली. यात बदल होण्यासाठी ना. मुरलीधर मोहोळ नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास ही खर्डेकर यांनी व्यक्त केला. ह्या साहसी क्रीडा प्रकारासाठी अखिल च्या कुटुंबियांनी त्याला प्रोत्साहन दिले यामुळे खरंतर त्यांचेही कौतुक करायला हवे असे मत मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.
एव्हरेस्ट वीर अखिल स्मिता रवींद्र काटकर (वय ३६) हे पुण्यातील एक गिर्यारोहक, प्रशिक्षक आणि गिरिप्रेमी संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. २१ मार्च १९९० रोजी जन्मलेल्या अखिल यांनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून काही वर्षे स्वतःचा कॅफे व्यवसायही यशस्वीपणे चालवला. मात्र पर्वत, साहस आणि समाजाभिमुख कार्याची ओढ त्यांना पुन्हा गिर्यारोहण क्षेत्रात घेऊन आली.
सध्या ते पूर्णवेळ गिरिप्रेमी संस्थेशी जोडलेले असून लहान मुलांसाठी प्रशिक्षण उपक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गिर्यारोहणासोबतच मॅरेथॉन, ट्रायथेलॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
२१ मे २०२६ रोजी अखिल काटकर यांनी गिरिप्रेमीच्या इतर दोन सहकाऱ्यांसमवेत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट वर यशस्वीरित्या चढाई केली  आणि भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला.
अखिल काटकर यांची एव्हरेस्ट शिखर चढाई ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून नव्या पिढीला आरोग्य, साहस, शिस्त आणि ध्येयपूर्तीकडे प्रेरित करणारी उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
अखिल चे अभिनंदन आणि सत्कार करतानाच अधिकाधिक तरुण तरुणींना विद्यार्थी दशेपासूनच ह्या खेळा प्रती आकृष्ट करण्यासाठी शिक्षण द्यावे अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.
Exit mobile version