Site icon Jan Bharat Samachar

फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या: आमदार अमित गोरखे

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८ मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नसून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच शासनाने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.

आमदार गोरखे यांच्याकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन
घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार अमित गोरखे यांनी फुगेवाडी परिसरातील बाधित भागाला प्रत्यक्ष भेट दिली. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी आम्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा धीर त्यांनी दिला. जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा तपास भरकटवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आमदार अमित गोरखे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र

या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त (CP) यांना तातडीने अधिकृत पत्र पाठवून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी.दापोडी, फुगेवाडी या परिसरांसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार व झोपडपट्टी परिसरांमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेले अनधिकृत हातभट्टीचे आणि बेकायदेशीर दारूचे अड्डे पुढील २४ तासांत तात्काळ उद्ध्वस्त करण्यात यावेत. सर्व मृत नागरिकांचे शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल तातडीने मागवून घेऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे. हा मृत्यू विषारी दारूमुळे किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा बेकायदेशीर गोष्टी पुन्हा घडू नयेत, यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात यावी आणि पोलिसांची गुप्तवार्ता यंत्रणा (Intelligence) अधिक सतर्क करावी.

रुग्णालयात दोघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत

या दुर्दैवी घटनेत एकाच वेळी आठ नागरिकांचा बळी गेला असतानाच, दुसरीकडे सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल हे दोन तरुण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. आमदार गोरखे यांनी त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. पिंपरी-चिंचवड शहराला अवैध धंद्यांचा विळखा बसू दिला जाणार नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मी स्वतः राज्याच्या गृहविभागाकडेही सातत्याने पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी शेवटी दिली.

Exit mobile version