Site icon Jan Bharat Samachar

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

Spread the love

मुंबई, दि. ४ जून २०२६: सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (दि. ३) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या अभिमानास्पद कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ (६४ टक्के) एकट्या महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ८१७ (३४ टक्के) कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महाराष्ट्रानंतर हरियाणा- १ लाख ९० हजार, राजस्थान- १ लाख २७ हजार, उत्तरप्रदेश- ७१ हजार ५३८, झारखंड- ६१ हजार ४५२, गुजरात- २१ हजार ८९४ अशी क्रमवारी आहे. याआधी महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्याची नोंद डिसेंबर २०२५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. सौरपंपाच्या पॅनेल्समधून २५ वर्षे वीज निर्मिती होते. त्यामुळे आतापर्यंत १० लाखांवर शेतकऱ्यांची वीजबिलांमधून मुक्तता झाली आहे. तर दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळत आहे. यासोबतच शेतातील विद्युत अपघातांचा धोकाही पूर्णतः टळला आहे. या सौर पॅनेल्समुळे सिंचनासह शेत घरातील विविध उपकरणे, मोबाईल चार्जिंग व ई-वाहन चार्जिंग करणेही सहज शक्य झाले आहे. तसेच शिल्लक विजेच्या आधारे शेतकऱ्यांना छोटे कृषिपुरक अन्य व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

या योजनेतील प्रत्येक सौरपंपाला ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक आहे. तसेच सोलर पॅनेल्स आणि पंपाचे नुकसाननैसर्गिक आपत्ती तसेच चोरीविरोधी विमा संरक्षणही उपलब्ध आहे. सौर कृषिपंपाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांना महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईट, २४ तास सुरु राहणारे टोल फ्री क्रमांक आणि संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध आहे.

Exit mobile version