पुणे, दि. ४: पुणे विभागात अन्न व औषध प्रशासन विभागाने १ व २ जून २०२६ रोजी भेसळीच्या संशयावरून ठिकठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत ३१ लाख ७३ हजार रुपयांचे अन्न पदार्थांची जप्ती केली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यासह त्यासंबंधी १४ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेनुसार अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनाची तपासणी व धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
सातारा जिल्ह्यात १ जून रोजी गोडोली, सातारा येथील मेसर्स धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा.लि. येथे केलेल्या कारवाईत प्रोटिरिच- डब्ल्यू हर्बल हेल्थ ड्रिंक, चॉकलेट कंपाऊंड, सी बकथॉर्न ज्यूस याचा एकूण २१ लाख ४० हजार ९४६ रुपयांचा अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात २ जून रोजी ४२३, मार्केट यार्ड येथील मेसर्स प्राज ट्रेडर्स येथे कारवाई करून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल, आर.बी.डी. पामोलीन ऑईल याचा एकूण ५ लाख ३४ हजार २५२ रूपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. केशवनगर, काळेवाडी रोड, चिंचवड येथील मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी येथे धडक कारवाईअंतर्गत २७ हजार ६०० रूपयांचे ‘चीज ॲनालॉग’ जप्त करण्यात आले आहे.
वडगाव शेरी येथील स.नं. ५०/४, मते नगर येथील मे. विठूमाऊली डेअरी येथे भेसळयुक्त गाईचे तूप आणि पनीर असा सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. स.नं. ३७/१, सुप्रिया बिल्डिंग, खराडी येथील मे. शिवदत्त डेअरी येथे १ लाख ७३ हजाराहून अधिक रकमेचे पनीर जप्त करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात २ जून रोजी बाजारगेट, कोल्हापूर येथील मे. बनछोडे ब्रदर्स ऑईल मिल येथे ९२ हजार रुपयांचा रिफाईन्ड कॉटनसीड ऑईल व फिल्टर्ड ग्राऊंडनट ऑईलचा साठा जप्त करण्यात आला. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी येथील बालाजी चौकातील मे. रामगोपाल भवरलाल सोनी येथे ९७ हजार ६०० रुपये किमतीचा रिफाईन्ड सोयाबीन ऑईल साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. धरणगुट्टी ता. शिरोळ येथे मे. हिदांश इंडस्ट्रीज येथे टाकलेल्या छाप्यात ८ हजार ८८० रुपयांचा ॲनालॉग सुपारी साठा भेसळीच्या संशयावरून व लेबलदोष, मिथ्याछाप असल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आला.
५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त
पुणे विभागात ठिकठिकाणी १४ आस्थापनांची तपासणी करून ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करून संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यासह अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
१ जून रोजी बाणेर येथील शंभो पान शॉप व जय मल्हार पान शॉप या ठिकाणी तपासणी केली असता तेथून ७ हजार ५०० हून अधिक रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी फेज-१ येथे विनोद पान शॉप, रायरेश्वर पान शॉप, आयटी स्मोक झोन पान शॉप, सिद्धेश्वर पान शॉप व लक्ष्मी पान शॉप अशा एकूण ५ आस्थापनानंमधून एकूण २५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यात १ जून रोजी केलेल्या कारवाईत १ लाख ०७ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा व वाहतूक करणारी १ लाख ५० हजार रूपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात १ जून रोजी साताऱ्यातील बुवा पान शॉप, सदर बाजार, सातारा येथे धडक कारवाईदरम्यान ३० हजार ६०० रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात १ जून रोजी बाबा पान शॉप, गांधी चौक, अकलूज या ठिकाणी १ लाख १६ हजार रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा तसेच ७५ रूपयांचे गुटखा बनवणारे यंत्र जप्त करण्यात आले. २ जून रोजी अगलगाव रोड, तालुका बार्शी येथील त्रिमूर्ती पान शॉप येथे १३ हजाराहून अधिक किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात २ जून रोजी सांगली येथील मे. ए के पान शॉप तसेच गांधी चौक, विटा येथील मे. बालाजी पान शॉप येथे धडक कारवाईदरम्यान सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच बेकायदेशी प्रतिबंधित अन्न उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असून नागरिकानी अशा बाबीची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर द्यावी, असे आवाहन श्री. भोगावडे यांनी केले आहे.

