मुंबई, दि. ५ जुन २०२६: महावितरणचा २१ वा वर्धापन दिन शनिवारी (०६ जून) मोठ्या उत्साहात मात्र साधेपणाने साजरा होत आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यालय ‘प्रकाशगड’ येथे शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिराला सामाजिक बांधिलकी जोपासत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर जे. जे. महानगर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्त बाटल्यांचे संकलन झाले.
मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महावितरणचा २१ वा वर्धापन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता ‘प्रकाशगड’ येथील प्रेक्षागृहात आयोजित वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विधायक व सामाजिक उपक्रमाची जोड देताना पूर्वसंध्येला मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांनी शिबिरात सहभागी होत रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

