Site icon Jan Bharat Samachar

येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

Spread the love

पुणे, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांनी येरवडा येथील खुले कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमासाठी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधनचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३ हजार १३१ चे प्रांतपाल संतोष मराठे , रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर आणि सदस्य, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे व इतर अधिकारी, रोटरी डिस्ट्रिक्ट संचालक पर्यावरण श्री राजेंद्रकुमार सराफ उपस्थित होते.

येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील एक एकर जागेवर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या घनदाट नागरी वनामुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमता वाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकाराची शहरी घनदाट जंगले ही शहराची फुफ्फुसे आहेत.केवळ वृक्षलागवड करून थांबणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे. हा परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

Exit mobile version