Site icon Jan Bharat Samachar

खराडी जमीन वादात मारहाण; प्रीतम खांदवे आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुणे : खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रीतम खांदवे (वय ४१), पंकज संजय पाटोळे (वय ३४), जेसीबी चालक तसेच इतर काही जणांचा समावेश आहे. प्रीतम खांदवे हे प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती आहेत.

याबाबत अल्ताफ अमजद शेख (वय २६, रा. आपले घर सोसायटी, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. अल्ताफ शेख हे खराडीतील पार्वती पाटील यांच्या मालकीच्या जागेची गेली पाच ते सहा वर्षे देखरेख करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये याच प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी तहसीलदारांनी संबंधित जागेत प्रीतम खांदवे यांना प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश दिला होता.

तक्रारीनुसार, ३० मे रोजी रात्री प्रीतम खांदवे हे काही जणांसह जेसीबी मशीन घेऊन संबंधित जागेवर आले. त्यांनी जागेवर काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षारक्षक अल्ताफ शेख यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच जागामालक पार्वती पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अल्ताफ शेख यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रीतम खांदवे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जागेच्या वादाची पार्श्वभूमी, तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन झाले का आणि मारहाणीच्या आरोपांबाबत सखोल तपास सुरू केला आहे. पुढील तपास खराडी पोलिस करत आहेत.

Exit mobile version