Site icon Jan Bharat Samachar

AVGC क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणारे ‘फ्रेमबॉक्स नेक्स्ट फ्रेम’ चर्चासत्र संपन्न

Spread the love

पुणे : फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूट ऑफ इमर्जिंग मीडियातर्फे पुण्यातील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल येथे ‘नेक्स्ट फ्रेम’ या विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष चर्चासत्राच्या पहिल्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना AVGC (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

भारतातील उदयोन्मुख माध्यम (Emerging Media) क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून फ्रेमबॉक्सने या चर्चासत्राच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणत सर्जनशीलता, नावीन्य आणि कथाकथनाच्या ताकदीची ओळख करून दिली. AVGC क्षेत्रातील वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी आणि उद्योगातील अपेक्षा याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित माहिती मिळाली.

या चर्चासत्रात फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूट ऑफ इमर्जिंग मीडियाचे संस्थापक व संचालक राजेश आर. तुराखिया यांच्यासह अनुभव खन्ना (जनरल मॅनेजर – प्रोडक्शन, ग्रीन गोल्ड ॲनिमेशन), आशिष थापर (सीईओ, हायटेक ॲनिमेशन स्टुडिओ), द्रुहिन मुखर्जी (सह-संस्थापक आणि सीटीपीओ, गॉडस्पीड गेम्स), विदित कुंद्रा (सह-प्रमुख, सीजी, असेम्ब्लेज एंटरटेनमेंट) आणि सुबोध एस. नरवाडे (असिस्टंट कंपोझिटिंग सुपरवायझर, फिल्म सीजीआय) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर यावेळी धर्मराज वाघ उपस्थित होते.

चर्चासत्रामध्ये उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्य, रोजगारक्षम कौशल्यांचा विकास, ॲनिमेशनमधील कॅरेक्टर क्रिएशन, आधुनिक व्हीएफएक्स तंत्रज्ञान, न्यूक-आधारित कंपोझिटिंग, तसेच भारतातील गेमिंग क्षेत्राचे भविष्य अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. फ्रेमबॉक्सचे ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगमधील उद्योग-भागीदारी असलेले पदवी कार्यक्रमही यावेळी विशेष चर्चेचा विषय ठरले. हे कार्यक्रम ग्रीन गोल्ड ॲनिमेशन, झेबू ॲनिमेशन स्टुडिओ आणि गॉडस्पीड गेम्स यांसारख्या आघाडीच्या संस्थांच्या सहकार्याने राबविले जातात.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सत्रांमधून विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन पाइपलाईन्स, उद्योगातील नवीन संधी, जागतिक प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी कार्यपद्धती आणि करिअरच्या विविध वाटांबाबत सखोल माहिती मिळाली. या चर्चासत्राला विद्यार्थी, व्यावसायिक भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूट ऑफ इमर्जिंग मीडियाचे संस्थापक राजेश आर. तुराखिया म्हणाले, “नेक्स्ट फ्रेमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची आणि उद्योगातील दिग्गजांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम भारतातील AVGC क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याच्या आणि पुढील पिढीतील सर्जनशील प्रतिभांना प्रेरणा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

या उपक्रमामुळे AVGC क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तव परिस्थिती, कौशल्यांच्या गरजा आणि भविष्यातील संधींचे स्पष्ट चित्र मिळाले असून फ्रेमबॉक्सची उद्योग-केंद्रित आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख अधिक बळकट झाली आहे.

Exit mobile version