Site icon Jan Bharat Samachar

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन महोत्सव २०२६; अशोककुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

Spread the love

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत,बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव दि. २४, २५ व २६ जून २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने आणि दिमाखात साजरा केला जातो अशी माहिती बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अलविरा मोशन एंटरटेन्मेंट च्या संचालिका दिपाली कांबळे,पराग चौधरी,चित्रसेन भवार,मंदार जोशी,अरुण गायकवाड,शशिकांत कोठावळे आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ एक वास्तू नसून महाराष्ट्रातील कलाकारांच्या भावना, संस्कार आणि कलासाधनेचे केंद्र आहे. महाराष्ट्रातील नाटक, तमाशा, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, मराठी वाद्यवृंद, कलापथक, शाहिरी, झाडीपट्टी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, जादूगार, भारूड आदी विविध कलाप्रकारांतील कलाकारांना एकत्र आणणारा हा महोत्सव राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, दि. २४ जून २०२६ रोजी, ऑर्केस्ट्रा क्षेत्रात तब्बल ६५ वर्षे उल्लेखनीय योगदान देणारे ‘मेलडी मेकर्स’चे निर्माते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच तमाशा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आला असे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे पत्रकारिता विभागातील विद्याधर कुलकर्णी-(लोकसत्ता) ,सागर आव्हाड – (साम टीव्ही) ,विजय जगताप – (पुणे वार्ता) यांना ‘बालगंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक पुनीत बालन, भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, काँग्रस चे जेष्ठ नेते उल्हासदादा पवार,अलविरा मोशन एंटरटेन्मेंट च्या संचालिका दिपाली कांबळे तसेच डॉ. संजय चोरडिया उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि मान्यवर कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.

तसेच या तीन दिवसीय महोत्सवात राज्यभरातील विविध कलाक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०२ कलाकारांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. लावणी, लोकधारा, जादूचे प्रयोग, ऑर्केस्ट्रा, तमाशा तसेच इतर विविध लोककला आणि सांस्कृतिक कलाप्रकारांतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हा संपूर्ण तीन दिवसीय महोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम यावेळी सादर केले जाणार आहेत. विविध कला प्रवाहांतील कलाकार आणि रसिकांना एकत्र आणणारा हा वर्धापन महोत्सव मोठ्या उत्साहात आणि वैभवात संपन्न होणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

Exit mobile version