पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्य ग्रीन अर्थ अवॉर्ड २०२६’चे वितरण
पुणे : “पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनातून त्यात योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी वैयक्तिक पातळीपासून सुरुवात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे (आयसर) सल्लागार डॉ. अरविंद नातू यांनी केले. शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या ‘आर-९ पॉइंट प्रोग्राम’ची माहितीही त्यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चच्या वतीने आयोजित ‘सूर्य ग्रीन अर्थ अवॉर्ड्स २०२६’ वितरण सोहळ्यात डॉ. अरविंद नातू बोलत होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात आयोजित कार्यक्रमात कायनेटिक कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर, ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, डॉ. सारिका झांबड आदी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘सूर्य ग्रीन अर्थ अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. मेधा ताडपत्रीकर, डॉ. राहुल मराठे, डॉ. श्वेता लोखंडे, शिल्पा भालेराव, प्राची शेवगावकर, डॉ. किरण वैद्य यांना पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, सुवर्णपदक व ‘सूर्यदत्त’चे उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. दीपक शिकारपूर यांनी हरित माहिती तंत्रज्ञान (ग्रीन आयटी) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण संवर्धनास चालना देण्याची गरज व्यक्त केली. तसेच पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मेधा ताडपत्रीकर यांनी पर्यावरणपूरक नवकल्पनांची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. राहुल मराठे यांनी शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीचे महत्त्व सांगितले. डॉ. श्वेता लोखंडे यांनी जलसंपदा आणि आरोग्य क्षेत्रातील परस्परसंबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शिल्पा भालेराव यांनी उद्योग क्षेत्रात शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला, तर प्राची शेवगावकर यांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात कृतीशील भूमिका घ्यावी, असे सांगितले. डॉ. किरण वैद्य यांनी हरितगृह परिणामाचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले.
सुषमा चोरडिया यांनी सूर्यदत्त संस्थेच्या स्थापनेपासूनच पर्यावरणपूरक कॅम्पसवर भर दिला आहे. वृक्षाथॉनसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश दिला जातो. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन उपक्रमात सामावून घेतले जाते, त्यातून त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण होते, असे सांगितले.
स्नेहल नवलखा यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. सारिका झांबड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. श्रद्धा फाटक यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. भाग्यश्री पवार यांनी आभार मानले.

