Site icon Jan Bharat Samachar

खडकी येथील कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रात दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणास प्रतिसाद

Spread the love

पुणे: शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, खडकी (पुणे) येथे आयोजित एकदिवसीय दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात राज्यातील ९५ पुरुष आणि ९ महिला अशा एकूण १०४ पशुपालकांनी सहभाग घेतला.

कुक्कुटपालनाव्यतिरिक्त दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढीपालनाचे प्रशिक्षण देण्याची पशुपालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात देशी-विदेशी गायी व म्हशींच्या जाती, कृत्रिम रेतन व गाभण जनावरांची देखभाल, संतुलित आहार, मुरघास बनवण्याच्या पद्धती व चाऱ्याचा दर्जा सुधारणे, लसीकरण, गोचीड व जंतनिर्मूलन, विषबाधेवर उपाय व स्वच्छ दूध उत्पादन या विषयांबाबत पशुपालकांना माहिती देण्यात आली. तसेच कमी खर्चात अधिक नफा मिळवणे, प्रकल्प अहवाल तयार करणे व ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ची सविस्तर माहिती पशुपालकांना देण्यात आली.

दुग्धव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील पशुपालकांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविणे आणि पशुसंवर्धनावर आधारित उद्योगांना चालना देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक औताडे (कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, खडकी, पुणे–०३) यांनी सांगितले.

“पारंपारिक पद्धतींसोबतच आधुनिक, वैज्ञानिक व शास्त्रीय व्यवस्थापनाची जोड दिली, तर दुग्धव्यवसाय हा अधिक फायदेशीर ठरू शकतो. पशुपालकांची हीच गरज ओळखून आम्ही अशा विशेष प्रशिक्षणांवर भर देत आहोत. भविष्यातही ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ व इतर शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरुण, महिला व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात अशा प्रकारची प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण सत्रे नियमितपणे आयोजित केली जातील.”

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

Exit mobile version