Site icon Jan Bharat Samachar

परिस्थिती कोणतीही असो, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत _सहपोलीस आयुक्त संजय दराडे

Spread the love

पुणे : मी देखील पहिली ते चौथीपर्यंत महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतले असून, आज तुमच्या शहराचा सहपोलीस आयुक्त म्हणून उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थिती कोणतीही असो, मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी मेहनत घ्यावी आणि आई-वडील तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन व म्हणणे ऐकावे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणत्याही परिस्थितीतून यशस्वी होता येते, असे मत पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईतील बुरुड आळी येथे म्हसोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ५१ हजार रुपयांच्या वह्या व शालेय साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व्यावसायिक रमणशेठ लुंकड, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, पेशवाई क्रिएशनचे अमोल येमुल, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.

शुक्रवार पेठेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन शाळा क्र. १, समर्थ प्रतिष्ठान, सौ. सुशीलाबाई विरकर हायस्कूल संस्थेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांतर्गत ६ हजार वह्या आणि १ हजार रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, धार्मिकतेला विधायकतेची आणि सामाजिक कार्याची जोड देत समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबविणे ही आजच्या काळाची गरज आहे. केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे कौतुक आहे. एखाद्याला पुढे जाण्यासाठी बोट देणारा कोणी तरी असावा लागतो आणि हे काम ट्रस्ट करत आहे, अशा शब्दांत त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

  1. निवृत्ती जाधव म्हणाले, ट्रस्टच्या वतीने गेली सात वर्षे एक हजार वह्यांपासून आज सहा हजार वह्यांपर्यंतचे वाटप करत आहोत. ज्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहेत आणि पटसंख्या कमी झालेली आहे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Exit mobile version