पुणे: दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजू व गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यंदा कार्यक्रमाचे २० वे वर्ष असून, येत्या रविवारी (ता. २३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता नवी पेठेतील एसएम जोशी सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती संस्थेचे शिष्यवृत्ती प्रदान समारंभ समितीचे अध्यक्ष सुजीत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निखिल पडवळ आणि चिन्मय कुलकर्णी उपस्थित होते. सुजीत शिंदे म्हणाले, “या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दत्त्तात्रय वारे गुरुजी, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. भाऊसाहेब जाधव अध्यक्षस्थानी असणार आहेत. उद्योजक गणेश जाधव, दिशा परिवाराचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण आणि दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक रवीकुमार इंडी उपस्थित राहणार आहेत.”
पुण्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागातून विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी येतात. मात्र उच्चशिक्षणाचा खर्च करु शकत नसल्याने त्यांचे शिक्षण अपुरे राहू नये, या उद्देशाने राजाभाऊ चव्हाण यांनी २० वर्षांपूर्वी दिशा परिवाराची स्थापना केली. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, यंदा २५० विद्यार्थ्यांना जवळपास ८ लाख रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
‘आम्ही फक्त दोन हातांमधले अंतर कमी करतो’ या उक्तीप्रमाणे दिशा परिवार गरजू विद्यार्थी आणि दाते यांना जोडणारा दुवा म्हणून काम करतो. गेल्या २० वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळालेले आणि आता आपल्या क्षेत्रात स्थिरावलेले विद्यार्थीच आता दाते झाले असून, मदतीची ही साखळी अशीच सुरू राहील अशी आशा आहे. दिशा परिवार केवळ अर्थिक मदत देऊन थांबत नाही, तर विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला करिअर मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्त्व विकास, तज्ज्ञ मार्गदर्शन यांसारखे विविध कार्यक्रमही राबविण्यात येतात, असे पडवळ यांनी यावेळी सांगितले.

