Site icon Jan Bharat Samachar

चाकणमधील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना

Spread the love

पुणे, दि. २३ ऑगस्ट २०२६ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. वाढत्या औद्योगिक वीजभाराचा विचार करून त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई येथील केंद्राचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर ३३/२२ केव्ही भांबोली उपकेंद्रात अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करून औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी

महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला.

२२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे.  तसेच, ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त ‘फिडर बे’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली. तर २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

Exit mobile version