Site icon Jan Bharat Samachar

प्रेरणापथ ही बंदी बांधवांच्या आयुष्याची नवीन पहाट – माधुरी मिसाळ.

Spread the love

अंधारात आणि निराशेत जगणाऱ्या बंदी बांधवांच्या आयुष्यात प्रेरणापथ प्रकल्पाने उज्वल भविष्याची आणि प्रकाशाची रम्य पहाट निर्माण केली आहे. कारागृह हे फक्त कारागृह न राहता सुधारगृह होण्याची प्रक्रिया प्रेरणापथ प्रकल्पाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष होत आहे या दृष्टीने महाराष्ट्र कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान, पुणे आणि आदर्श मित्र मंडळ -पुणे यांनी उभारलेले काम हे सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य सार्थ ठरविण्याच्या प्रवासात मैलाचा दगड ठरले आहे. यासाठी शासनातर्फे लागणारे सर्व सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन राज्यमंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण श्रीमती माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
गेले काही दिवस येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांना गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले होते. या बांधवांनी बनवलेल्या मूर्ती विक्री स्टॉलचे उद्घाटन मा. माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक कारागृह सुधारसेवा डॉ.सुहास वारके, सीआयडी चे महानिरीक्षक श्री सुधीर हिरेमठ, कारागृह महानिरीक्षक श्री योगेश देसाई ,येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक श्री सुनील ढमाळ , आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, गणेशोत्सव चळवळीतील कार्यकर्ते श्री शिरीष मोहिते, भाऊसाहेब करपे, युवराज निंबाळकर, राजाभाऊ भणगे, आप्पासाहेब घाटे, शेखर देडगावकर, नारायण सुर्वे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड प्रताप परदेशी, एड.शिरीष शिंदे, एड. श्रीकांत अगस्ते आदि मान्यवर उपस्थित होते.
अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांनी याप्रसंगी बोलताना या बंदी बांधवांमधील लपलेल्या कलागुणांना बाहेर काढून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणापथ या प्रकल्पाला स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे आणि पुणेकर यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही आनंददायी गोष्ट असून बंदी बांधवांच्या मानसिकेत परिवर्तन करण्यासाठी अशा उपक्रमामुळे मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.
सीआयडी चे महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केवळ समस्येवर चर्चा न करता त्याच्या मुळाशी जाऊन कारणे शोधून काम करणाऱ्या संस्था या फार कमी असून कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी या दृष्टीने स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना बंदी बांधवांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून त्यांच्यातील चांगला माणूस बनवण्याची सुरुवात करण्यासाठी गेली बारा वर्षे हा प्रकल्प सुरू असून त्याला समाजाच्या विविध स्तरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. या बांधवांनी बनवलेले गणपती बाप्पा हे मॉरिशस येथील गणेशभक्त तसेच जगप्रसिद्ध तालयोगी शिवमणी, संगीतकार आनंदजी ( कल्याणजी आनंदजी ) यांनी खरेदी करून या बंदी बांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे अशी माहिती दिली.
या पर्यावरणपूरक मुर्त्या शाडू माती पासून बनवलेल्या असून गणेश भक्तांनी या खरेदी करून या बांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने यानिमित्ताने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत दोमा यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड. प्रताप परदेशी यांनी केले.

Exit mobile version