ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
केवळ मोठ्या आणि देखण्या इमारती उभ्या राहिल्याने शहराचा सर्वांगीण विकास होत नाही. शहराच्या विकासाबरोबरच कला, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणेही आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचे मूळ सोडून विकास साधता येणार नाही. परदेशी संस्कृती आणि वेशभूषेचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. ३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या संरक्षक अभिनेत्री, नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.
राधाकृष्णन म्हणाले, गणेश हा प्रथम पूजनीय देव असून त्याच्या स्मरणाने मंगलमय कार्याची सुरुवात केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना किल्ल्यांचे जतन केले. तंजावरमध्येही त्यांनी तमिळ साहित्याच्या जतनासाठी योगदान दिले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात मोठी चळवळ उभी केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अभूतपूर्व संविधान दिले. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे कराराचाही त्यांनी उल्लेख केला.
पुणे हे विद्येचे माहेरघर असून देशातील महत्त्वाच्या लष्करी संस्था येथे आहेत. सिम्बायोसिस विद्यापीठातील विविध देशांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम हे विविधतेतील एकतेचे उदाहरण आहे. भाषा, जात, धर्म, रंग आणि खाद्यसंस्कृती वेगवेगळी असली तरी भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र बांधते. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशातील विविध कला आणि संस्कृती एकाच व्यासपीठावर येत असून कलाकारांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही या महोत्सवाचे योगदान आहे. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुढील वर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठीतून भाषण करण्याची इच्छा व्यक्त केली. मराठी शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करून समाजात मोठी चळवळ उभी केली. आयटी, वाहन उद्योग, शिक्षण आणि संस्कृतीमुळे पुण्याला देशात वेगळे स्थान आहे. विविधतेला कलेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम पुणे फेस्टिव्हलने केले आहे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, सुरेश कलमाडी यांनी ३८ वर्षांपूर्वी लावलेले सांस्कृतिक रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. पुणे फेस्टिव्हल हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पुणेकरांचा कलेचा मोठा उत्सव आहे. अनेक पिढ्यांना कलेच्या माध्यमातून जोडण्याचे काम या महोत्सवाने केले आहे. स्वर्गीय अजितदादांसोबत दोन वर्षांपूर्वी पुणे फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याच्या आठवणी सांगताना त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे फेस्टिव्हलला आवश्यक आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मंत्रिमंडळात पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि बहुसांस्कृतिक वारशाचा उल्लेख केला. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम पुणे फेस्टिव्हलने केले असून परंपरा आणि इतिहासाचे जतन करताना आधुनिकतेची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन जोशी यांना ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’
यंदाचा पुणे फेस्टिव्हल संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला. त्यांच्या कार्यावर आधारित नऊ मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात आली. यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या रणमर्द शिवाजी मंडळ आणि श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठानचाही सन्मान करण्यात आला.
विविध देशांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण
सनई वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र सन्मानगीत आणि वंदे मातरम सादर करण्यात आले. ज्येष्ठ नृत्यगुरू शर्वरी जेमिनीस यांनी दहा शिष्यांसह गणेशवंदना सादर केली. सिम्बायोसिस विद्यापीठातील २० देशांतील २३ विद्यार्थी आणि १५ भारतीय विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ‘चक दे इंडिया’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ या गीतांवरील सामूहिक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन मराठीत राहुल सोलापूरकर आणि इंग्रजीत समीरा गुजर यांनी केले.
‘अंधमुक्त पुणे’ चळवळीअंतर्गत पुणे फेस्टिव्हल आणि अलायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान फॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले. एमटीडीसी, कोहिनूर ग्रुप, सुमाशिल्प लिमिटेड आणि प्राइड ग्रुप हे मुख्य प्रायोजक, तर पंचशील आणि भारत फोर्ज सहप्रायोजक आहेत.

