Site icon Jan Bharat Samachar

शेतकऱ्यांनो, खचून जाऊ नका, धीर सोडू नका!

Spread the love

पुणे : संकटं कितीही मोठी असली, तरी आपला लढा त्याहून मोठा आहे. दुष्काळाचे संकट तात्पुरते आहे; मात्र शेतकऱ्यांची मातीशी असलेली नाळ, कष्ट करण्याची वृत्ती आणि जिद्द कायम आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धीराने उभे राहावे. या संघर्षात जय गणेश व्यास पीठाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असा विश्वास पीयूष शाह यांनी शेतमजुरांना दिला.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या सामाजिक भावनेतून जय गणेश व्यासपीठ, पुणे शहरातील पाच गणेश मंडळे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने बीड मधील धुमेगाव येथील जय हनुमान देवस्थान परिसरात विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत आडपिंपरी व धुमेगाव येथील ४१ गरजू शेतकरी व शेत मजूर कुटुंबांना धान्य, किराणा साहित्य, दिवाळीचा फराळ आणि आकाशकंदील भेट देण्यात आले. संकटाच्या काळात या कुटुंबांना आधार देत त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

यावेळी जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून पुढाकार घेणाऱ्या मंडळांमध्ये साईनाथ मंडळ ट्रस्ट, श्री शिवाजी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, तावरे कॉलनी, सत्यवीर मित्र मंडळाचे (शिवदर्शन), नवज्योत मित्र मंडळ, येरवडा,  पीयूष शाह ,प्रल्हाद भाऊ थोरात, तेजस हिरणवाळे ,सुधीर ढमाले , उमेश वैद्य आणि अमित जाधव यांचा सहभाग होता. तसेच मराठा साम्राज्य सेना संस्थापक अध्यक्ष संग्राम ढोले पाटील, विठ्ठल घोडके, महेश घोडके, सुमित अन्नदाते आदी गावकरी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पीयूष शाह , सुधीर ढमाले प्रल्हाद भाऊ थोरात, कुमार आणवेकर, अमित जाधव , उमेश वैद्य यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश वैद्य यांनी केले, तर भाऊ थोरात यांनी आभार मानले.

“सण केवळ आपल्या घरात साजरा करून आनंद मिळत नाही, तर संकटात असलेल्या दुसऱ्याच्या घरातही आनंदाचा दिवा लावता आला पाहिजे. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” अशा भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जय गणेश व्यासपीठ आणि सहभागी गणेश मंडळांच्या या उपक्रमातून सामाजिक एकोपा, माणुसकी आणि गणेशोत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.

Exit mobile version