पुणे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी चिंचवडमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून सर्व पथके विहीत वेळेत मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १३० अधिकारी, कर्मचारी नियुक्त आणि ४८ सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे. आज थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यापूर्वी सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना नेमून दिलेल्या वाहनांमध्ये बसवून विहीत वेळेत केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले होते. साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथके देण्यात आली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.