Site icon Jan Bharat Samachar

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा; महावितरण

Spread the love

पुणे, पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी ९०२९१४०४५५, सातारा- ९०२९१६८५५४, कोल्हापूर- ७८७५७६९१०३ आणि सांगली जिल्ह्यासाठी ७८७५७६९४४९ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. तारेचा झोल किंवा तार जमिनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्राचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे.

व्हॉटस् अॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच दुरूस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजूरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

महावितरणचे रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिकटवू नयेत. पोस्टर्स किंवा पत्रके चिकटवताना विद्युत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारचे पत्रके किंवा पोस्टर्स वीजयंत्रणेवर लावू नयेत किंवा चिकटवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version