Site icon Jan Bharat Samachar

द फोक आख्यान’ मध्ये परंपरेला आधुनिकतेचा साज

Spread the love

पुणे . अभंग, गण, गवळण, पोवाडे, पारंपरिक गीते, गोंधळ असे लोककलेचे प्रकार नवनवीन रचना आणि चाली बांधून रसिकांसमोर उलगडले. ढोलकी, ढोलक, संवादिनी, डफ, बासरी, टाळ, संबळ अशा वाद्यांवर थाप देताच उमटणाऱ्या सुरांची गुंफण पुणेकरांनी अनुभवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक लोककला आहेत, त्यांची माहिती यानिमित्ताने तरुणाईसह उपस्थितांना मिळाली.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात आयोजित संगीत महोत्सवाचे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘द फोक आख्यान – थाट ह्यो जुना, खेळ हा नवा हा अनोखा कार्यक्रम हर्ष, विजय, ईश्वर अंधारे व सहका-यांनी सादर केला.

लोककलेचा समृद्ध वारसा ओघवत्या शैलीत आणि वैविध्यपूर्ण सादरीकरणासह तरुणाईने उपस्थितांसमोर मांडला. पारंपरिक वेशभूषेसह विविध प्रकारच्या वाद्यांचे वादन यानिमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मिळविण्यात असलेले शाहिरांचे योगदान यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र लोकधारेचे अत्यंत ताकदवान असे स्वरूप यानिमित्ताने तरुण कलाकारांकडून पाहायला मिळाले.

संगीत महोत्सवाचा प्रारंभ प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, पंडित रविचारी, रुना रिझवी शिवमणी व सहका-यांच्या पुष्पांजली या कार्यक्रमाने झाला. तर दुसऱ्या दिवशी पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील व सहका-यांची शास्त्रीय, उप-शास्त्रीय, नाटयपद व भक्तीसंगीताची मैफल पार पडली.

 

Exit mobile version