Site icon Jan Bharat Samachar

बालकुमार चित्रपट महोत्सव गुरुवारपासून

Spread the love

दिग्पाल लांजेकर यांचे पाच ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी

 

पुणे .संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 24 ते बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, कावरे आईस्क्रीमचे संचालक राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी महोत्सवाच्या सूत्रधार निकिता मोघे, संयोजक केतकी महाजन-बोरकर उपस्थित होत्या. महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणारा बालचित्रपट महोत्सव एकमेव असून महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे. चित्रपट महोत्सव कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात रोज सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला असून चित्रपट स्क्रीन क्रमांक 3 येथे दाखविण्यात येणार आहेत. महोत्सव फक्त मुलांसाठी असून पालकांना प्रवेश नाही. महोत्सवासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत.

प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे पाच ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी बालकुमारांना मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि. 24 रोजी सकाळी 9:30 वाजता केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक प्रवीण बढेकर, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी लांजेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

गुरुवार, दि. 24 रोजी ‌‘शिवरायांचा छावा‌’, शुक्रवार, दि. 25 रोजी ‌‘पावनखिंड‌’, शनिवार, दि. 26 रोजी ‌‘फर्जंद‌’, रविवार, दि. 27 रोजी ‌‘फत्तेशिकस्त‌’, सोमवार, दि. 28 रोजी ‌‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज‌’ (दिग्दर्शक तुषार शेलार), मंगळवार, दि. 29 रोजी ‌‘तेंडल्या‌’ (दिग्दर्शक सचिन जाधव, नचिकेत वाईकर), बुधवार, दि. 30 रोजी ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत.

प्रवेशिका मंगळवारपासून सकाळी 10:30 ते 12 या वेळात सिटी प्राईड, कोथरूड येथे मिळणार आहेत. प्रवेशिकांची संख्या मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. काही जागा राखीव आहेत.

Exit mobile version