Jan Bharat Samachar

चित्र’ कलेच्या दुनियेत रमले कलाप्रेमी

Spread the love

पुणे . पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, दिलीप जोशी (जेठालाल) यांचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्ररूप…अयोध्या श्रीराम मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, ताज महाल…भगवान श्रीकृष्ण, महादेव, गणपती, नटराज यांच्या विविध रूपांचे दर्शन अशा ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांच्या सुंदर कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. ऐतिहासिक स्मारकांची भव्यता, धार्मिक व पौराणिक कलाकृती यांसह विविध कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या.

द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती कारंजावाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात आहेत.

दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी झाले आहेत, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृती प्रदर्शनात आहेत. दिनांक २२ एप्रिल पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे.

Exit mobile version