Site icon Jan Bharat Samachar

वीररसाचे प्रगटीकरण म्हणजे शाहिरी_संस्कार भारती पश्चिम प्रांत उपाध्यक्ष अभय भंडारी

Spread the love

पुणे . शाहिरीच्या माध्यमातून आपल्याला परंपरेचे आत्मभान राहते. वीररसाचे प्रगटीकरण म्हणजे शाहिरी आहे. त्यामुळे पोवाडे प्रशिक्षण वर्गासारखे उपक्रम सातत्याने व्हायला हवे, असे मत संस्कार भारती पश्चिम प्रांत उपाध्यक्ष अभय भंडारी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने कलाग्राम, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे आयोजित विनाशुल्क पोवाडे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, कोथरूड चे सचिव वि. दा. पिंगळे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. शरद आगरखेडकर, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते. यावेळी स्व. शाहीर रत्न किसनराव हिंगे यांच्या प्रतिमेचे व शाहिरी वाद्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वि. दा. पिंगळे म्हणाले, नव्या पिढीच्या हातात पोवाडे नावाचे शास्त्र मिळाल्याने ही मुले देशभक्तच होतील. शाहीर व शाहिरीमुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडला, हे कोणी विसरता कामा नये. पोवाडयाचा हा वर्ग नवी पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिनांक १५ जून पर्यंत सायंकाळी ७ ते ८.१५ यावेळेत हा वर्ग सर्वांसाठी विनाशुल्क खुला असून वर्गाचे २८ वे वर्ष आहे. पोवाडा वर्गात शाहिरी नमन, गण, मुजरा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पोवाडा व महाराष्ट्रगीता शिकविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार यांनी केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.

Exit mobile version