Site icon Jan Bharat Samachar

भरत नाट्य संशोधन मंदिराचा 33वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव 9 मे पासून

Spread the love

पुणे . सुमारे 131 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराचा 33वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव दि. 9 ते 13 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

संगीत नाट्य रसिकांसाठी पर्वणी असलेल्या या नाट्य महोत्सवातील प्रयोग दरारोज सायंकाळी 5:30 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात गाजलेल्या नाट्यकृतींचा नव्याने रसास्वाद घेता येणार आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. 9 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवात भरत नाट्य मंदिराची निर्मिती असलेले नाट्य प्रयोग सादर केले जातात. पण या वर्षी पुण्यातील कोलाज क्रिएशन्स (आनंदमठ) आणि मुंबईतील विद्याधर गोखले प्रतिष्ठानची निर्मिती असलेली नाट्यकृती (बावनखणी) सादर केली जाणार आहे. ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत असलेल्या संगीत आनंदमठ या नाटकाद्वारे वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाचा दि. 9 रोजी शुभारंभ होणार आहे. दि. 10 रोजी संगीत बावनखणी,  दि. 11 रोजी हे बंध रेशमाचे, दि. 12 रोजी मत्स्यगंधा आणि दि. 13 रोजी कट्यार काळजात घुसली या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. राम साठ्ये, रवींद्र खरे, गौरी पाटील, वज्रांग आफळे, हृषिकेश बडवे, अनुष्का आपटे, निधी घारे, स्वरप्रिया बेहरे, गौतम कामत, मैत्रयी नायक, अभिजीत कासखेडीकर, ओंकार कपलाने, बद्रिश कट्टी यांच्या नाटकात भूमिका आहेत.

वासंतिक नाट्य महोत्सवाची तिकिट विक्री दि. 1 मे पासून सुरू होत असून तिकिट दर अत्यंत अल्प ठेवण्यात आले आहेत. सिझन तिकिट  1200/- रुपये तसेच 800/- रुपये आहे; तर दैनंदिन तिकिट दर 300/- रुपये आणि 200/- रुपये आहे.

Exit mobile version