Site icon Jan Bharat Samachar

तरुण पिढी संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था देईल : प्रा. मिलिंद जोशी

OLYMPUS DIGITAL CAMERA

Spread the love

पुणे : किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर यांच्या काळात वैभवाच्या शिखरावर असलेल्या रंगभूमीला बोलपटाच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. नाटक कंपन्या बंद पडल्या. अनेक नट बेकार झाले. रसिक बोलपटांकडे वळले. अशा काळात नवे नाटककार आणि अभिनेते यांनी संगीत रंगभूमीची परंपरा केवळ टिकवून ठेवली नाही तर अधिक समृद्ध केली. आधुनिक युगातल्या तरुण पिढीलाही परंपरेविषयी आस्था वाटते. ही प्रयोगशील असणारी तरुण पिढी संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था देईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. वासंतिक संगीत नाट्य महोत्सव सलग ३३ वर्षे आयोजित करीत असल्याबद्दल प्रा. जोशी यांनी भरत नाट्य मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे वासंतिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे ३३वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन भरत नाट्य मंदिर येथे प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन झाले. ऋषी बंकिमचंद्र यांच्या कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली.

भरत नाट्य मंदिराच्या या वासंतिक नाट्य महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, बंकिमचंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तो स्फूर्ती मंत्र आहे. स्वातंत्र्य संग्रामाची प्रज्वलित झालेली ज्योत अधिक तेजस्वी करण्याचे काम या स्फूर्ती मंत्राने केले. वंदे मातरम् हे दोन शब्द उच्चारत अनेक क्रांतिकारकांनी मृत्युला कवटाळले. तरुण पिढीसाठी हा नाट्य महोत्सव त्यांच्या नव कल्पनांना प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

भरत नाट्य मंदिराच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणारे कीर्ती कस्तुरे, ऐश्वर्या भोळे, आशुतोष नेर्लेकर, मधुरा शेलार, उमा जोशी यांचा तसेच आनंदमठ या नाटकातील मिलिंद सबनीस, अनुष्का आपटे , वज्रांग आफळे, अनुजा जोशी, रवींद्र सातपुते, अजय पराड, जयंत टोले, विनिता तेलंग या कलाकार-तंत्रज्ञांचा सत्कार प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

सुरुवातीस अभय जबडे यांनी महोत्सवाविषयी प्रास्ताविकात माहिती सांगितली तर प्रा. जोशी यांचे स्वागत पांडुरंग मुखडे यांनी केले. सूत्रसंचालन संजय डोळे यांनी केले.

Exit mobile version