Site icon Jan Bharat Samachar

महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ !!

Spread the love

पुणे . वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलींच्या गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने पालघर संघाचा ७-० असा सहज पराभव करून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. पुणे संघाची विजेतेपदासाठी मुंबई संघाशी लढत रंगणार आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पुणे जिल्हा संघाने सामन्यावर संपूर्णपणे वर्चस्व गाजवताना पालघर संघाचा ७-० असा धुव्वा उडविला. काल स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीमध्ये रायगड संघाचा ४-० असा पराभव करणार्‍या पुणे संघाने आज आपला विजय आणखी यशस्वी बनविला. सामन्याच्या सुरूवातीलाच यश मिळवताना पुणे संघाच्या आध्या अगरवाल हिने पाचव्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. हिमानी रावत हिने १४ व्या मिनिटाला आणि त्यानं तर चारच मिनिटांनी पुन्हा आध्या हिने गोल नोंदवून पुणे संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. पालघर संघाच्या रक्षक फळीवर दबाव निर्माण करताना पुण्याच्या स्ट्रायकर (आघाडीच्या) फळीने जोरदार खेळ केला. हिमानी रावत हिने दोन मिनिटांच्या अंतराने सलग दोन गोल नोंदवून पुण्याला ५-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात पुणे संघाने सामन्यावरील आपली पकड कमी होऊ दिली नाही. तनिष्का कवाडे (५८ मिनिट) आणि मिष्का अरूण (५९ मिनिट) यांनी गोल करून संघाची आघाडी ७-० अशी वाढवली आणि संघाला अंतिम फेरीत पोचवले. मुंबई जिल्हा संघानेही नागपुर संघाचा ७-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुण्यासह रायगड, कोल्हापुर, पालघर, मुंबई, नाशिक, नागपुर, रायगड आणि सातारा या संघांनी उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला होता.

सामन्यांचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः
पुणे जिल्हा संघः ७ (आध्या अगरवाल ५, १८ मि., हिमानी रावत १४, ३०, ३२ मि., तनिष्का कवाडे ५८ मि., मिष्का अरूण ५९ मि.) वि.वि. पालघर जिल्हा संघः०; पुर्वार्धः ५-०;

Exit mobile version