Site icon Jan Bharat Samachar

राम गान’: काव्य, गायन, चित्ररूपी त्रिविध सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध !

Spread the love

पुणे:  भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘आविष्कार क्रिएशन्स, पुणे’ प्रस्तुत ‘राम गान’ या कार्यक्रमात रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांचा काव्य, गायन आणि चित्ररूपात आनंद घेतला.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.

बंदिशकार व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील निवडक प्रसंगांवर रचना केलेल्या रागाधारी बंदिशींचे गायन आणि त्यावर आधारित त्यांच्याच चित्रांचे दृकश्राव्य प्रदर्शन सादर करून रसिकांना एक अद्वितीय अनुभव दिला. या कार्यक्रमात पं.अमोल निसळ, डॉ.सानिका गोरेगावकर,सावनी दातार, श्वेता कुलकर्णी आणि भाग्यश्री गोडबोले यांनी विविध रागांवर आधारित गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सुनील देवधर यांनी केले.

अमित जोशी (तबला), शुभदा आठवले (संवादिनी) आणि अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.भारतीय विद्या भवन पुणे केंद्र समितीचे सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, डॉ.जयश्री फिरोदिया, मोठ्या प्रमाणावर श्रोतु वर्ग उपस्थित होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.कार्यक्रमात सहभागी रसिकांनी सादरीकरणाची एकात्मता आणि कलात्मक सादरीकरणाची प्रशंसा केली.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा २४५ वा कार्यक्रम होता.प्रवेश विनामूल्य होता.या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Exit mobile version