Site icon Jan Bharat Samachar

गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

Spread the love

पुणे : ‘तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले.

अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर होते.

कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पुरस्कार वितरणानंतर नेहा महाजन यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग मधुवंती सादर केला. सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनायक कुडाळकर यांनी त्यांना तबल्यावर साथसंगत केली. ज्या मंचासमोर बसून मी अनेक मैफिली ऐकल्या आहेत तिथे सादरीकरण करण्याचे भाग्य मला मिळाले. खरेतर कलाकाराचे कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर होते; पण माझ्या सादरीकरणाच्या आधीच तुम्ही मला पुरस्कार देऊन गौरविले आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे, असे नेहा महाजन म्हणाल्या.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांची मैफिल रंगली. राग भुपालीच्या द्रुत बंदिशीने त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यानंतर रूपक मध्ये ठुमरी सादर करून संत कबीरांच्या भजनाने मैफलीची सांगता केली. मंद्र, मध्य आणि तार सप्तकात त्यांचा आवाज लीलया फिरणाऱ्या आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), चारुहास दामले, आदित्य जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version