Site icon Jan Bharat Samachar

पाचव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे १४ जूनपासून आयोजन !!

Spread the love
पुणे, १० जूनः स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे पाचव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा १४ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक ऋषीकेश पुजारी, विवेक कुबेर, केतन पासलकर आणि अमित देशपांडे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष असून या स्पर्धेत पुण्यातील क्लब, कॉर्पोरेट असे एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी स्पर्धेचे सामने होणार आहेत. गतवर्षी कल्याण क्लबने स्पर्धेचे विजेतेपद तर, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळवले होते.

या स्पर्धेत फुलट्रॅक एआय टेक्नॉलॉजी पार्टनर्स यांच्यावतीने डिसीजन रिव्ह्यु सिस्टीम (डीआरएस) या अतिरिक्त तांत्रिक सुविधेचा लाभ सर्व सहभागी संघांना घेता येणार आहे. या तांत्रिक उपलब्धतेमुळे सामन्यांमधील निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासपूर्ण होऊन अचूक निर्णयांचा फायदा संघांना मिळणार आहे. अशापद्धतीने स्थानिक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच फुलट्रॅक एआय टेक्नॉलॉजी पार्टनर्स यांच्यावतीने या डीआरएस पध्दतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब, जीएसके क्रिकेट क्लब, कॅप क्र्युसडर्स, कल्याण क्रिकेट क्लब, गॅट्स अँड ग्लोरी, रायझिंग चॅम्पियन, कॉर्पोरेट विलोव्हर्स, मास्टर्स क्लब, रियुनायटेड क्रिकेट क्लब, पुणे रेंजर्स क्लब, द किंग्ज्मन, पुणे टायटन्स्, टायटन बुल्स् आणि आयोजक स्पाटर्न क्रिकेट क्लब पुणे या संघांमध्ये विजेतेपदासाठीची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक याबरोबरच स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिके देण्यात आहेत.

Exit mobile version