Site icon Jan Bharat Samachar

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

OLYMPUS DIGITAL CAMERA

Spread the love

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा आणि विचारधारेने चालणारी माणसे एकत्र येतात तेव्हा त्या संस्थेच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य घडते. अशा संस्थांकडे मदतीचे हात येतात, लोकांचे पाय वळतात. अशी लोकांना एकत्र घेऊन जाणारी संस्था म्हणजे वसुंधरा फाऊंडेशन होय. वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून पंचतत्त्वातील पृथ्वी म्हणजेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य केले जात आहे ते गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी केले.

वसुंधरा फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वसुंधरा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी (दि. 16) आयोजन करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ममता सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ वक्ते श्याम भुर्के अध्यक्षस्थानी होते. वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले यांच्यासह राजेश दातार, आनंद सराफ, मोहन ठोंबरे, पियूष शहा, शिरीष मोहिते, उदय जगताप मंचावर होते.

प्रिया सावंत, शैलजा लोखंडे, स्नेहल जाधव, अजित माने, सुनील रोट्टी, मेधा जेरे, प्रसाद शिवरकर, विठ्ठल सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराने गौरव करण्यात आला.समाजभान जपणाऱ्या व्यक्तींचा वसुंधरा फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे ही गोष्ट स्पृहणीय आहे, असे नमूद करून ममता सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारप्राप्त व्यक्ती अधिक जोमाने कार्यरत होतील. समाजाला त्यांच्याकडून अधिक विस्तृत स्तरावर कामाची अपेक्षा आहे.

 

अध्यक्षपदावरून बोलताना श्याम भुर्के म्हणाले, वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य करणारी माणसे ही देवमाणसे आहेत. त्याग करून घर टिकवून ठेवणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आच, प्रेम, ममता वसुंधरा फाऊंडेशनच्या कार्यातून जाणवते. पुरस्काराच्या निमित्ताने वसुंधरा फाऊंडेशनने माणसातील चांगुलपणाची स्तुती, गौरव केला आहे.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभंग, लोकसंगीत व स्फूर्तीदायी भक्ती-शक्ती शिवगीतांचा संगम असलेला कार्यक्रम अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी सादर केला. मान्यवरांचे स्वागत धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले, उदय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज देशपांडे, शिल्पा देशपांडे यांनी केले. सुरुवात ॲड. मनिषा भोसले यांनी ‌‘असेच एक झाड होऊया‌’ ही स्वरचित कविता सादर केली. मोनिका गोखले यांनी नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली.

 

Exit mobile version