Jan Bharat Samachar

निघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Spread the love

नववीच्या वर्गाचे उत्साहात उदघाटन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अनेक अधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी असून पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली पाहिजेत असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील निघोजे येथील पुणे जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, सरपंच सुनीता येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


विभागीय आयुक्तांनी बालकांना बोट धरून नेले शाळेत..!
या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणा-या बालकांना विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बोट धरून शाळेत नेले. असा अनोखा अनुभव मिळाल्याने त्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेचा हा आनंददायी प्रवेश बालकांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण ठरला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, शाळा, ग्रामस्थ आणि पालक यांची एकत्रित भूमिका शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. या कामात निघोजे येथील ग्रामस्थांचा भरीव सहभाग आहे. येथे भविष्यात व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ, फुगे व फुले देऊन आनंददायी वातावरणात नव्या वर्षाची सुरुवात करण्यात आली. नववी-दहावीच्या वर्गांचे उद्घाटन आणि कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत किचनशेडचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
नववीच्या वर्गांची सुरुवात
निघोजे शाळेची एकूण पटसंख्या ८३६ असून, यापुढे मुलींना नववी व दहावीच्या शिक्षणासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही. हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील निघोजे, गलांडवाडी व धानोरे या तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गांना मान्यता दिली आहे. ही बाब महाराष्ट्रात प्रथमच घडली असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

Exit mobile version