जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य
"पुस्तक कोट" : ग्रामीण भागातील विद्यार्थांना पुस्तकांचा देणार महाप्रसाद
पुणे : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या जन्माचे औचित्य साधून जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून आज (दि. २१) श्री गणेश जयंतीच्या पूर्वसंख्येला श्री गणेशाच्या चरणी पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. वाचन संस्कृती रुजावी या हेतूने महाप्रसादाच्या रूपाने या पुस्तकांचे वाटप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी ही पुस्तके आहेत.
गुरुवारी (दि. २२) गणेश जयंती असल्याचे निमित्त साधून जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत आज हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. अमर लांडे यांनी श्री गणेशाची भव्य रांगोळी रेखाटली होती. त्या भोवती विद्यार्थ्यांना देण्यासाठीची हजारो पुस्तके आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियूष शहा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमात वीर शिवराज मंडळाचे किरण सोनिवाल, एकता मित्र मंडळ ट्रस्टचे सुधीर ढमाले, नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद थोरात, सत्यवीर मित्र मंडळाचे उमेश वैद्य, गिरिजा मित्र मंडळाचे अनिरुद्ध भोसले, श्री शनी मारुती मंडळाचे सचिन पवार, देशप्रेमी मित्र मंडळाचे केदार बलकवडे, ओम हरिहरेश्र्वर मंडळाचे भूषण बोकिल सेवा मित्र मंडळाचा अमर लांडे यांचा सहभाग होता. कुणाल पवार, राहुल आलमखाने, नंदू ओव्हाळ, विक्रम गोगावले यांच्यासह विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पियूष शहा यांनी प्रास्ताविकात उपक्रमाविषयी माहिती दिली.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पुस्तक पूजन करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर केला. शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण अथर्वशीर्ष पठण केले.



