गुरु -शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा धागा
प्रा. राम बडे ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम

पुणे : भारत हा विश्वगुरू होता. मधल्या काळात संस्कृती नष्ट झाली. आपण आपल्या मूळ ज्ञान व संस्कृतीपासून दूर आलो आहोत. मात्र आपण आपली संस्कृती सोडलेली नाही. भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्यामध्ये आपले प्रत्येकाचे योगदान असणे गरजेचे आहे. गुरु -शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा धागा आहे, असे मत प्रा. राम बडे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस च्या वतीने नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात गुरुपौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रा. राम बडे म्हणाले, जगभरात प्रचंड अस्थिरता आहे. सगळीकडे युद्धजन्य व अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मात्र, भारत व महाराष्ट्रात ही अस्थिरता दिसत नाही. कुंभमेळा, पंढरीची वारी यासारख्या ठिकाणी अनेकजण श्रद्धेपोटी येतात. असे चित्र भारताबाहेर कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे काही ना काही विशेष आपल्या भारतभूमीमध्ये आहे.
ते पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती ही याकरिता कारणीभूत असून यामधील महत्वाचा धागा म्हणजे गुरु -शिष्य परंपरा आहे. कितीही थोर व्यक्तिमत्वे असली, तरी त्या प्रत्येकाला गुरूंची आवश्यकता असते. अशी अनेक उदाहरणे इतिहासात होऊन गेली आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमा व गुरु – शिष्य परंपरेला विशेष महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.