मराठा शौर्य दिनानामित्त लालमहालात अष्टधान्यतुला
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे आयोजन

पुणे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त पानिपत वीरांना शौर्यवंदना देण्याकरीता लालमहाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आजच्या काळात स्वतःच्या कर्तुत्वावर शौर्य गाजवणाऱ्या तीन वीरांची अष्ट धान्य तुला करण्यात आली. महावितरण महाराष्ट्र मानव संसाधन चे संचालक राजेंद्र पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांची अष्टधान्यतुला करण्यात आली.
कार्यक्रमाला अक्षरसृष्टी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक डॉ. प्रफुल्ल पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सुपे येथील संस्थानिक संग्रामसिंह राजे पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांसह महाराष्ट्रातील पदाधिकारी व पवार घराण्यातील बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमात अभ्यासक अनिल दुधाने, हाड वैद्य निखिल पवार यांना धार पवार कुलभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. शस्त्रपूजन, ध्वजपूजन, लाठी काठी आदी विविध कार्यक्रमाद्वारे पानिपतवीरांना अभिवादन करण्यात आले. पानिपत ही मराठयांची व्यथा नाही, तर आमची शौर्यगाथा आहे, असे अभिमानाने सांगत पानिपत युद्धातील वीरांना व पानिपतवीर श्रीमंत महाराजा यशवंतराव पवार यांच्या वंशजांनी नमन केले.
राजेंद्र पवार म्हणाले, विजेचे महत्व अनन्यसाधारण आहे. मी देखील मर्यादित वीज वापरून माझा अभ्यास केला असून मला विजेचे महत्व आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वीज नाही, त्याठिकाणी वीज पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असतो. ग्रामीण भागात देखील प्रत्येक ठिकाणी वीज उपलब्ध होण्यास नेहमीच सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
उदय जगताप म्हणाले, गुन्हेगारी आणि नक्षलवाद वाढत असताना तरुणाई भरकटत होती. त्या काळात गणेश मंडळांच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये वाढणाऱ्या नक्षलवादी भागात काम करण्याचा निर्णय घेतला. या कार्यामुळे बंदुकीऐवजी पेन हातात आले, हिंसेऐवजी अहिंसेचे विचार रुजले. झेंडे जाळणारे आज झेंडा वंदन करत आहेत. एकेकाळी नक्षलवादाने ग्रस्त असलेला गडचिरोलीचा भाग आज शांततेसाठी गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला आहे. हीच गणेश मंडळांच्या कार्याची खरी ताकद आहे, असेही त्यांनी सांगितले.
सागर पवार म्हणाले, मराठयांनी केवळ मराठी साम्राज्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केले. मराठी मातीतील मुलांकडे हा राष्ट्रनिष्ठेचा संस्कार वारश्यानेच आला आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा आखत भगवा झेंडा अटकेपार नेण्याकरीता लढा देण्यात. दि.१४ जानेवारी १७६१ पानिपत येथील लढाईमध्ये श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार सैन्याने मोठा लढा दिला.या युद्धात महाराजा यशवंतराव पवार कामी आले, त्यांना अभिवादन करण्याकरता अभिवादन कार्यक्रम होता, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन प्रा.डॉ. कुमदिनी पवार यांनी केले. आभार स्मिता पवार यांनी मानले.
फोटो ओळ – श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त पानिपत वीरांना शौर्यवंदना देण्याकरीता लाल महाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळात स्वतःच्या कर्तुत्वावर शौर्य गाजवणाऱ्या राजेंद्र पवार, सुनीतराजे पवार, उदय जगताप यांची अष्टधान्यतुला करण्यात आली.


