ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर
शाश्वत आर्थिक विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे – विवेक सावंत
ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन

निगडी (पुणे), ता. २: “देशाचा शाश्वत आर्थिक विकास साधायचा असेल, तर इनोव्हेशन केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख, सर्वसमावेशक आणि व्यापक व्हायला हवे. ग्रामीण भाग, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि तळागाळातील उद्योजकांना सक्षम करणारी नवोन्मेषाची परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसी एल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी केले.
नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे (एसीआयसी) उद्घाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. प्रसंगी अटल इनोव्हेशन मिशनचे अधिकारी आशिष पांडे व दीपाक्षी जिंदल, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख, सीएसआर हेड डॉ. चंद्रकांत रावळ, ज्ञान प्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे, निगडी केंद्राचे प्रमुख मनोज देवळेकर, ‘एसीआयसी’चे संस्थापक संचालक यशवंत लिमये व संगीता कुलकर्णी, मुख्य नवोपक्रम अधिकारी ॐकार गुर्जर आदी उपस्थित होते.
विवेक सावंत म्हणाले, “भारताची लोकसंख्या, कौशल्य आणि स्थानिक समस्यांचे स्वरूप पाहता सामाजिक नवोन्मेषाला मोठी संधी आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर देताना त्यातून नाविन्यपूर्ण उपाय कसे शोधता येतील, यावर संशोधन व्हायला हवे. शिक्षण, उद्योग, संशोधन संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे काम केल्यास रोजगारनिर्मिती, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला गती मिळेल. तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झाला, तर त्याचा व्यापक परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होईल.”
आशिष पांडे म्हणाले, “ज्ञान प्रबोधिनी हे अटल सामाजिक नवोन्मेष केंद्र (एसीआयसी) सुरू करणारे पुण्यातील पहिले केंद्र आहे. देशभरात अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुमारे २५ एसीआयसी केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी हे केंद्र ग्रामीण आणि तळागाळातील समाजघटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. ज्ञान प्रबोधिनीचे शेतकरी, महिला बचत गट, ग्रामीण नागरिक आणि स्थानिक उद्योजक यांच्याशी आधीपासूनच मजबूत जाळे असल्याने हे केंद्र योग्य ठिकाणी उभारल्याचे समाधान आहे. या केंद्राला देशातील सर्वोत्तम सामाजिक नवोन्मेष केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
या माध्यमातून ग्रामीण भागातील नवकल्पनांना चालना मिळेल, रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच नवोन्मेषाची संस्कृती शालेय वयापासूनच रुजावी, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्योजकीय विचार विकसित करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. ज्ञान प्रबोधिनीचे हे केंद्र महाराष्ट्रातील सामाजिक नवोन्मेषासाठी एक प्रभावी मॉडेल ठरेल, असे दीपाक्षी जिंदल यांनी नमूद केले.
‘एसीआयसी’च्या माध्यमातून ग्रामीण उद्योजक, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्टार्टअप्स आणि सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग सल्ला व निधी उपलब्ध करून देण्याच्या विविध उपक्रमांची माहिती संगीता कुलकर्णी व ॐकार गुर्जर यांनी दिली. बांबू आधारित उद्योग, कृषी व कृषी-जैवतंत्रज्ञान, औषधी वनस्पती, अन्न प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, महिला उद्योजकता, ग्रामीण उद्योग आणि सामाजिक नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये उद्योगनिर्मितीला विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत रावळ यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोज देवळेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. वैभव मोगरेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.



