धर्मपुणेब्रेकिंग न्यूज़मराठी

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद

Spread the love

पुणे : जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… च्या अखंड जयघोषात पुण्यामध्ये श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. विविध राज्यातील पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच मिरवणुकीतील कारंजे आणि हायड्रोलिक हत्ती या विशेष आकर्षणांचा अनुभव घेत त्यावर पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठया उत्साहात स्वागत केले. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले होते. इस्कॉन संस्थेचे संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, हेमंत रासने, निरंजन डावखरे, महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष आणि भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांसह पुण्यातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथ यात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस तसेच राधिका विनोद प्रभू, सौम्य निताई प्रभू, अ‍ॅड. अभिजित साकुरकर, सहस्र तीर्थ प्रभू, अमर सोनवणे, पुजारी कौस्तुभ प्रभू आणि रूप गोस्वामी प्रभू आणि भक्त सेवा प्रभू उपस्थित होते. रथयात्रेचे यंदा १० वे वर्ष होते.

भाविक अतिशय जल्लोषात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि त्यावर भाव विभोर होऊन भक्त भगवान जगन्नाथाच्या रथासमोर नृत्य करीत होते. रथ यात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्यांच्या गालीच्यावर रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता. स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. मार्गावर गीता आणि भागवतावर आधारीत पुस्तकांचे आणि प्रसादाचे वितरण चालू होते.
झुलणाऱ्या हत्तीवर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषभूषेतील तसेच नृसिंह देव, वराह देव आणि बालाजींच्या वेशभूषेतील कलाकार लक्ष वेधून घेत होते.

भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

विशेष म्हणजे स्वयंसेवक रथ यात्रा गेल्यानंतर मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या हा कचरा उचलून घेत होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली होती. समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती झाली. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले. तर, रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!