छतावरील सौरऊर्जेस प्रोत्साहनासाठी पुण्यात फिरणार ‘सूर्यरथ’

पुणे : ‘पीएम-सूर्यघर मोफत वीज योजने’त जास्तीत जास्त घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी २६ जुलै २०२६ रोजी पुण्यात चिखली येथे ‘सूर्यरथ’ या फिरत्या जनजागृती मोहिमेस प्रारंभ होणार आहे. केंद्रीय नागरी विकास आणि सहकार राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’द्वारे (NSEFI) पीडब्ल्यूसी (PwC) आणि एनर्जिवा व्हेंचर्स यांच्या सहकार्याने हा ‘सूर्यरथ’ सुरू केला जात आहे. ही मोहीम शासनाच्या ‘पीएम-सूर्यघर मोफत वीज योजना’चा एक भाग आहे. छतावरील सौरऊर्जा प्रणालीद्वारे देशातील १ कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हा विशेष ‘सूर्यरथ’ पुढील आठ दिवस पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, मुख्य चौक आणि निवासी भागांत फिरणार आहे. या रथासोबत तज्ज्ञांचे एक पथक असेल, जे नागरिकांना सौरऊर्जा प्रणालीचे फायदे प्रत्यक्ष समजावून सांगेल. तसेच, छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान, बँक कर्जाची सुविधा आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया याबद्दल जागेवरच सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
सूर्यघर योजनेमुळे नागरिकांचे विजेचे बिल शून्यवत होते. त्यामुळे पुणेकरांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे. चिखली येथील भव्य समारंभाने या महत्त्वपूर्ण जनजागृती मोहिमेचा श्रीगणेशा होणार असून, याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ’प्रधानमंत्री- सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना १ ते ३ kW क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३०,००० ते ७८,००० रुपयांपर्यंत थेट अनुदान उपलब्ध आहे, तर गृहनिर्माण सोसायट्यांच्या सामायिक वापरासाठी प्रति किलोवॅट १८,००० रुपये अनुदान दिले जाते.



