खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा
- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

पुणे : पुणे शहर आणि लगतच्या परिसराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या खडकवासला धरणाची घटलेली साठवण क्षमता हा गंभीर आणि दीर्घकालीन प्रश्न आहे. धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली.
राज्यसभेतील विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे ३.७५ टीएमसी होती. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून साचलेल्या गाळामुळे धरणाची प्रभावी साठवण क्षमता निम्म्यापेक्षा अधिक घटली असून, ती सध्या जवळपास १.७५ टीएमसी इतकी राहिल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
साठवण क्षमतेत झालेल्या या मोठ्या घटीमुळे पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी साठवून ठेवण्याची तसेच पावसाळ्यानंतर वाढती शहरी पाण्याची गरज भागविण्याची धरणाची क्षमता कमी झाली आहे. पुणे हे वेगाने विस्तारत असलेले महानगर असून, पिण्याचे पाणी, उद्योग, सार्वजनिक सेवा आणि पर्यावरणीय गरजांसाठी भविष्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे.
विशेषतः अपुऱ्या पावसाच्या वर्षांत घटलेली जलसाठवण क्षमता जलव्यवस्थापन यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण करू शकते. त्यामुळे पुण्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसह सध्याच्या जलसाठवण आणि वितरण व्यवस्थेच्या क्षमतेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
खडकवासला जलाशयाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने गाळ काढणे, पाणलोट क्षेत्रात उपचारात्मक कामे करणे, गाळ व्यवस्थापन, जलाशयाचे आधुनिकीकरण आणि प्रभावी जल अंदाजपत्रक तयार करणे यांसारख्या उपाययोजनांचा संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने अभ्यास करावा, अशी मागणी डॉ. कुलकर्णी यांनी केली.
खडकवासला जलाशय प्रणालीचे सर्वंकष मूल्यमापन करून तिची भविष्यातील शाश्वतता निश्चित करणे आवश्यक आहे. पुणे शहरातील लाखो नागरिकांची जलसुरक्षा, शहरी विकास, सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक विकास यांच्याशी हा प्रश्न थेट संबंधित आहे. त्यामुळे आजच योग्य उपाययोजना केल्यास भविष्यात उद्भवणारे मोठे जलसंकट टाळता येईल, असेही डॉ. कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखात स्पष्ट केले.


