सिंबायोसिस करंडक २०२५ – आंतरमहाविद्यालयीन मराठी नाट्यवाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: :- सिंबायोसिस कला व वणिज्य महाविद्यालय, पुणे येथील मराठी नाट्य मंडळाच्या वतीने सिंबायोसिस करंडक आंतरमहाविद्यालयीन मराठी नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे ४१वे वर्ष साजरे करण्यात आले. या उपक्रमाला पुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ३० महाविद्यालयांतील ३७ संघांनी सहभाग नोंदवला व त्यातून ९ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीमध्ये विविध शैलीतील नाट्यसंहितांचे प्रभावी वाचनाचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये आवाजातील चढ-उतार, भावनांची अभिव्यक्ती आणि सुस्पष्टता यांचा उत्कृष्ट समन्वय दिसून आला.
प्राथमिक फेरीचे परीक्षण लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी तर, अंतिम फेरीचे परीक्षण ख्यातनाम रंगकर्मी विभावरी देशपांडे आणि श्री. निरंजन पेडणेकर यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन मराठी नाट्यमंडळाचे प्रमुख डॉ. निलेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. टेसी थडथील यांनी कार्यक्रमास पूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन दिले. तसेच डॉ. शरयू भाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंबायोसिस करंडक विद्यार्थ्यांना मराठी साहित्य, रंगभूमी आणि वाचनकलेशी जोडणारा एक सृजनात्मक आणि समृद्ध मंच ठरला आहे.
अंतिम फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे
- प्रथम क्रमांक: सर परशुरामभाऊ महाविद्यालय: जॅकपॉट
- द्वितीय क्रमांक: शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय: शिवाजी सुपर मार्केट
- तृतीय क्रमांक: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ: हॅलो!
- उत्तेजनार्थ: पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय: किनो
वैयक्तिक पारितोषिक:
- सर्वोत्तम वाचिक अभिनय पुरुष – पुष्कराज भन्साळी – शिवाजी सुपर मार्केट
- सर्वोत्तम वाचिक अभिनय स्त्री – आर्या वंडकर – जॅकपॉट
- सर्वोत्तम दिग्दर्शन – समर्थ खळदकर – जॅकपॉट
- उत्तेजनार्थ दिग्दर्शन – मैत्रेय नवघरे – हॅलो!
- सर्वोत्तम विद्यार्थी लेखन – अभिजित झाकणे & समर्थ खळदकर – जॅकपॉट
- उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखन – अनुष्का भोरटे – कीनो