चुनावब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता मतदारांना 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Spread the love

राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दि. १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार असून सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दि. 30 डिसेंबर 2025 रोजी शासन परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत :-
(1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
(2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
(3) अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
(4) उपरोक्त नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
असे या शासन परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तरी सदर शासन परिपत्रकाची नोंद घेऊन नवी मुंबईतील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील मतदार नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना 15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी किंवा अ.क्र. (3) मध्ये नमूद केल्यानुसार काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात यावी असे सूचित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!