संविधानामुळेच महिलांना सन्मानाचे आयुष्य मिळाले: डॉ. हुलगेश चलवादी
चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने महिलांचा गौरव : भगवा फेटा घालून महिलांचा उत्साही सहभाग

पुणे:-जागतिक महिला दिनानिमित्त चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने आज, रविवारी (ता.८) एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन नेते व माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी, ॲड.रेणुकाताई चलवादी-शिर्के आणि स्वप्नील शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या चलवादी शिक्षण संस्थेतील मातृशक्तीचा ‘भारतीय संविधानाची प्रत’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित महिलांनी परिधान केलेला ‘भगवा फेटा’. या पारंपरिक वेशभूषेमुळे कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा आणि अस्मिता दिसून आली.कार्यक्रमात सत्कारमुर्ती प्राचार्य स्मिता लोंढे, व्यवस्थापक सायली शिंदे, उपप्राचार्य बिना कदम, जयश्री कदम, ज्योती सचदेवा, अश्विनी मोहिते व इतर सर्व शिक्षक, शिकेतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.स्नेहभाजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संविधान हाच महिलांचा खरा आधार
याप्रसंगी बोलताना डॉ.हुलगेश चलवादी म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याचा आणि मोकळा श्वास घेण्याचा अधिकार दिला आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल यात मर्यादित न राहता, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपला विकास साधावा,असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. सावित्रीमाई, जिजाऊ तसेच रमाई यांनी महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याची दिशा दाखवनू दिली, असे डॉ.चलवादी म्हणाले.
कर्तृत्व गाजवा, संधीचे सोने करा
ॲड. रेणुकाताई चलवादी-शिर्के यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. त्या म्हणाल्या, “आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी स्त्रियांना संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा वेळी संविधानातील तरतुदी आणि कायदे महिलांचे रक्षक म्हणून उभे राहतात. मातृशक्तीने स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येक संधीचे सोने केले पाहिजे.महिलांच्या जीवनात तिचे वडील, भाऊ, पती, मुलगा यांचे स्थान महत्वाचे आहे. त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावूनं महिला आपल्या प्रगतीचा मार्ग जोपासू शकते, असे अॅड.रेणुका म्हणाल्या.चलवादी परिवारातील सर्वात छोटी सदस्य ‘छकुली’चा हा पहिला महिला दिवस आहे, यानिमित्त त्यांनी आपल्या लेकीला देखील शुभेच्छा दिल्या.

