ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बस सेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

Spread the love

पुणे, दि. १३ एप्रिल २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भारती विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ या बस सेवेचा विस्तार करण्यात आला असून, ही सेवा आता पुणे विद्यापीठातून जोशी गेट मार्गे थेट खडकी जंक्शन (खडकी रेल्वे स्टेशन) पर्यंत सुरू करण्यात आली आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या या विस्तारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, प्रवाशांसाठी अधिक सुलभ, जलद आणि थेट प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या विस्तारामुळे विशेषतः खडकी जंक्शनवर उतरलेल्या प्रवाशांना स्वारगेट तसेच भारती विद्यापीठापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासानंतर शहरातील विविध भागांमध्ये जाण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा अधिक किफायतशीर आणि वेळ वाचवणारी ठरणार आहे.

औंध रोड परिसरातील नागरिकांसाठीही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्व घटकांच्या प्रवासात सुलभता येणार आहे. तसेच, कालीबारी मंदिर आणि अय्यप्पा मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ही बस सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता, खडकी जंक्शनचा पर्यायी वापर वाढविणे आवश्यक ठरत आहे. सध्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या खडकी जंक्शनवर थांबत असल्याने या स्थानकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलच्या बस सेवेचा हा विस्तार शहराच्या एकूण वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा ठरणार आहे.

फक्त दोन किलोमीटरच्या अल्प विस्तारातून नागरिकांना बहुआयामी फायदे मिळत असल्याने, कमी अंतराच्या नियोजनबद्ध बदलांमधून मोठा परिणाम साधण्याचा हा एक उत्तम नमुना मानला जात आहे.

दरम्यान, या विस्तारित बस सेवेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमासाठी उपमहापौर तसेच स्थानिक नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे यावेळी नगरसेवक सनी निम्हन यांनी नमूद केले. या प्रसंगी पीएमपीएमएलचे अजय खेडेकर साहेब, उपमहापौर परशरामजी वाडेकर, नगरसेविका भक्तीताई गायकवाड, स्वप्नाताई छाजेड तसेच सनी निम्हन उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

चौकट-
फक्त सुमारे दोन किलोमीटरचा अल्प विस्तार — पण नागरिकांसाठी मोठा बदल ठरणारा निर्णय!
या छोट्या अंतरवाढीतून खडकी जंक्शनपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्याने प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर झाला आहे. कमी अंतरातील नियोजनबद्ध सुधारणा केल्यास शहराच्या वाहतूक व्यवस्थेत व्यापक आणि दूरगामी सकारात्मक परिणाम साधता येतात, याचे हे प्रभावी उदाहरण मानले जात आहे. असे सनी विनायक निम्हण म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!